Home / Uncategorized / अभिलेखांशिवाय चौकशीला हजर; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची चालढकल? पंचायत समितीच्या आदेशालाच हरताळ…!

अभिलेखांशिवाय चौकशीला हजर; ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची चालढकल? पंचायत समितीच्या आदेशालाच हरताळ…!

 मंठा प्रतिनिधी गजानन माळकर पाटील 

खोराड सांवगी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीदरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आवश्यक अभिलेख सादर न केल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही अभिलेखांशिवाय चौकशीला हजर राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दि. ३० जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, खोराड सांवगी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत बहुमत नसतानाही ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांनी संगनमत करून डी.एस.सी.चा वापर करत प्रशासकांच्या कुटुंबीयांच्या नावावर एफ.टी.ओ. तयार करून सुमारे ₹३ लाख ६९ हजार रकमेचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार श्री. भुरा रावसु पवार व इतर ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे दाखल केली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती मंठा यांनी ९ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी निश्चित केली होती. चौकशीसाठी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अद्ययावत अभिलेखांसह उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी ३ जुलै २०२६ रोजी दिले होते. तसेच आदेशाचे पालन न केल्यास होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी स्वतः जबाबदार राहतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले होते.

मात्र, चौकशीदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहिले असले तरी त्यांनी आवश्यक अभिलेख सादर केले नाहीत. अभिलेख १० जुलै रोजी सादर करण्यात येतील, असे नमूद करणारे लेखी निवेदन त्यांनी विस्तार अधिकाऱ्यांकडे दिल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे चौकशी प्रक्रियेत विलंब झाल्याची चर्चा असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कोणती प्रशासकीय कारवाई केली जाणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ₹३.६९ लाखांच्या कथित अपहाराच्या आरोपांची चौकशी अद्याप सुरू असून, चौकशीनंतर सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे. प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि दोषी आढळल्यास काय कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार