सोयगाव | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
शिवाजी माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण प्रसारक संस्था संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मूल्यवर्धन शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मूल्यवर्धन शिक्षणाचे सोयगाव तालुका समन्वयक एम. के. नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर व्यावहारिक कौशल्ये, नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास यांची जोड असलेले शिक्षणच विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया ठरेल,” असे प्रतिपादन केले.
नाईक यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील गरजा समजावून सांगत संवादकौशल्य, सांघिक कार्य, समस्या सोडविण्याची क्षमता, डिजिटल साक्षरता, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता यांसारख्या कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल मार्केटिंग, आर्थिक साक्षरता, वेळेचे नियोजन, तणाव व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या विषयांवरही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत मूल्यवर्धन शिक्षणाची संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांवर भर न देता स्वतःच्या कौशल्यांचा विकास करून भविष्यात सक्षम, जबाबदार आणि सर्जनशील नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास विकास पाटील, विजयसिंग राजपूत, ज्ञानेश्वर राठोड, पोपटराव सोनवणे, भूषण देसले, अमोल कोलते, मुकुंद व्यवहारे, भास्कर खमाठ, सुदाम राठोड तसेच शिक्षकेतर कर्मचारी अजबराव चव्हाण, श्याम जाधव, बाबासाहेब कोलते, राहुल बडक, संदीप कोलते आदींसह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच तालुका समन्वयक एम. के. नाईक यांचे आभार मानले.






