छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविले यश; प्राचार्य जीवन कोलते पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार
सोयगाव तालुक्यातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरली कांचनची कर्तबगारी

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील कु. कांचन साहेबराव रावळकर यांनी महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन आपल्या गावासह संपूर्ण सोयगाव तालुक्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम, जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कांचन या साहेबराव गोविंद रावळकर व सरला साहेबराव रावळकर यांच्या कन्या असून, त्यांनी ग्रामीण भागातील मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. स्पर्धात्मक वातावरणात सातत्याने मेहनत घेत त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील भरती प्रक्रियेत यश मिळविले. त्यांच्या निवडीमुळे सावळदबारा गावातून तसेच सोयगाव तालुक्यातून पोलीस दलात भरती होणारी त्या पहिली युवती ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे.
कांचन रावळकर यांच्या यशाबद्दल दि .१८/६/३६ रोजी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जीवन कोलते पाटील आणि मित्र मंडळ परिवाराच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील सेवाभावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभात बोलताना प्राचार्य जीवन कोलते पाटील म्हणाले की, “यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्य आवश्यक असते. कांचन रावळकर यांनी याच गुणांच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळविले आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत गावाचा आणि तालुक्याचा सन्मान वाढविला आहे. त्यांचे यश इतर विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरेल.”
मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्यानंतर कांचन यांच्या घरी अभिनंदनासाठी ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी होत आहे. सोशल मीडियासह विविध माध्यमांतूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शांताराम खराटे यांनीही कांचन रावळकर यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणासोबतच पोलीस भरती, सैन्य भरती, स्पर्धा परीक्षा आणि विविध शासकीय सेवांमध्ये पुढे येण्याची गरज आहे. कांचन यांचे यश हे ग्रामीण मुलींसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारे आहे. त्यांच्या यशामुळे अनेक मुलींना नवीन दिशा आणि आत्मविश्वास मिळेल.
या सत्कार कार्यक्रमास प्राचार्य जीवन कोलते पाटील, साहेबराव रावळकर, सरलाताई रावळकर, शांताराम खराटे, मयूर रावळकर, सागर गायकवाड, विजय रावळकर, रावळकर परिवारातील सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांचन रावळकर यांच्या यशामुळे सावळदबारा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या पुढील सेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.






