छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर : “हर घर खादी तिरंगा, हर मन खादी तिरंगा” हा संदेश देत शेंदुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नागरिक डी. एन. चौधरी यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिन उत्साहात, अभिमानाने आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन करण्याची आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प करण्याची संधी मिळणार आहे.
डी. एन. चौधरी म्हणाले की, राष्ट्रध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसून भारताच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा प्रतीक आहे. तिरंगा फडकविताना त्यामागील इतिहास आणि असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान प्रत्येकाने स्मरणात ठेवले पाहिजे.
महात्मा गांधी यांनी स्वदेशी, खादी आणि ग्रामोद्योगाला विशेष महत्त्व दिले होते. त्यामुळे शक्यतो खादीचा तिरंगा फडकवून स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहनही चौधरी यांनी केले. खादीशी कापूस उत्पादक शेतकरी, कारागीर, हातमाग व ग्रामोद्योगाशी संबंधित अनेक कुटुंबांचे जीवन जोडलेले आहे. त्यामुळे खादीचा तिरंगा स्वीकारणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याबरोबरच श्रमसंस्कृती आणि स्वदेशी विचारांचा सन्मान करणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
“तिरंगा प्रत्येक घरावर फडकला पाहिजे; मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो प्रत्येक भारतीयाच्या मनात फडकला पाहिजे. देशभक्ती केवळ घोषणांपुरती किंवा एका दिवसाच्या उत्सवापुरती मर्यादित न राहता ती आपल्या दैनंदिन आचरणातून दिसली पाहिजे,” असे चौधरी यांनी सांगितले.
जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या भेदांपलीकडे जाऊन ‘भारतीय’ हीच सर्वोच्च ओळख मनात रुजविण्याची गरज आहे. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना जोपासणे हीच स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक कुटुंबाने घरावर तिरंगा फडकवावा, मुलांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगावा, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करावे आणि विकसित, सक्षम व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन डी. एन. चौधरी यांनी केले.
“हर घर खादी तिरंगा, हर मन खादी तिरंगा” या संकल्पातून राष्ट्रप्रेमाची ज्योत अधिक प्रखर करूया. तिरंग्याचा मान राखूया, स्वातंत्र्याची शान जपूया आणि भारतमातेच्या वैभवासाठी एकजुटीने पुढे जाऊया. जय हिंद! वंदे मातरम्!” असा संदेश त्यांनी दिला.






