छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सजविलेल्या ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक; गुलाबपुष्पांचा वर्षाव, शैक्षणिक साहित्य वाटप आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राबविलेला अभिनव प्रवेशोत्सव संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला. शिक्षण विभागाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रमाला उत्सवाचे स्वरूप देत शाळेच्या वतीने नवागत व विद्यमान विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, गुलाबपुष्पांच्या वर्षावात आणि आनंदी वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आकर्षक पद्धतीने सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसवून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रंगीबेरंगी फुगे, विविध संदेशांचे फलक, घोषणाबाजी आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साहामुळे गावात अक्षरशः शिक्षणाचा उत्सव साजरा होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून फिरत असताना ग्रामस्थांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांवर गुलाबफुलांची उधळण करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण करणे, पालकांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता वाढविणे आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा होता. शाळेच्या या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक पालकांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत शिक्षण क्षेत्रात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
प्रवेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रप्रमुख जनार्दन साबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, पाठ्यपुस्तके, रंगकांडी बॉक्स आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी नव्या जोमाने शिक्षणाची सुरुवात केल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याचे दार उघडणारे प्रभावी साधन असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या यशस्वी उपक्रमासाठी मुख्याध्यापक विठ्ठल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भागवत गायकवाड, सतीश ढोणे, गजानन गवई, अनिल चव्हाण, मुठाळ सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सावळदबारा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या या आगळ्यावेगळ्या प्रवेशोत्सवामुळे शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हा या उपक्रमाच्या यशाची साक्ष देणारा ठरला. गावभर शिक्षणाचा संदेश पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






