Home / Uncategorized / गावभर शिक्षणाचा जल्लोष; टिटवी शाळेच्या प्रवेशोत्सवाने जिंकली सर्वांची मने…

गावभर शिक्षणाचा जल्लोष; टिटवी शाळेच्या प्रवेशोत्सवाने जिंकली सर्वांची मने…

छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत 

सजवलेल्या ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक; सभापती उत्तम चव्हाण यांच्या हस्ते फुलांच्या वर्षावात चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत

सोयगाव तालुक्यातील टिटवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वतीने शिक्षण हा केवळ ज्ञानाचा मार्ग नसून समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, याची प्रचिती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टिटवी येथे मुख्याध्यापक चांदणे सर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रवेशोत्सवातून आली. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकवटल्याने हा प्रवेशोत्सव शिक्षणाचा लोकोत्सव ठरला. आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे टिटवी गावात दिवाळीच्या उत्सवासारखे वातावरण निर्माण झाले होते.

सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण चिमुकल्याचे स्वागत करुन गुलाबाचे फूल देण्यात आले.तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा चैताली दीपक गौलखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. “शिक्षणाचा उत्सव गावभर” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

प्रवेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक. फुलांनी आणि रंगीबेरंगी सजावटीने नटलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले चिमुकले विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. गावातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि फुलांच्या वर्षावात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेला हा मान आणि सन्मान विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.

शाळा परिसरही आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे प्रेमाने स्वागत केले. फुलांच्या वर्षावात विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आत्मविश्वास आणि नव्या शैक्षणिक प्रवासाची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत होती.

या उपक्रमामागे प्रत्येक मुलगा-मुलगी शाळेत यावी, शाळेची पटसंख्या शंभर टक्के व्हावी आणि शिक्षणाबाबत समाजात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे हा प्रमुख उद्देश होता. प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता वाढविण्यात शाळेला यश आले असून विद्यार्थ्यांमध्येही शाळेविषयी आकर्षण निर्माण झाले आहे.

प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष मिष्ठान्नाची व्यवस्था करण्यात आली होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या गोड स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर पडली. “शाळा म्हणजे आनंद, ज्ञान आणि संस्कारांचे मंदिर” ही भावना त्यांच्या मनात अधिक दृढ झाली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या दिशेने हा प्रवेशोत्सव महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अनिल धाडे, मुख्याध्यापक गोपाल चांदणे, समस्त शिक्षकवृंद, माजी सरपंच वसंता जाधव, माजी संचालक प्रमोद पाटील, सदस्य संतोष जाधव, शांताराम राठोड, दिलीप जाधव, उमेश राठोड, कयूम तडवी यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक मख सर, मेमाणे सर, तेली सर आणि बाजुळगे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षणाबद्दलची आस्था, गावकऱ्यांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम यामुळे टिटवीचा हा प्रवेशोत्सव संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

चिमुकले झाले सेलिब्रिटी’

सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसून गावभर फेरफटका मारताना विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना अभिवादन केले. ग्रामस्थांनीही फुलांचा वर्षाव आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेला हा अनोखा सन्मान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा ठरला. त्यामुळे प्रवेशोत्सवाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार