मानोरा प्रतिनिधी : सुधीर ढगे
कानिफनाथ यात्रेनिमित्त परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांच्या सोयीसाठी विशेष डॉक्टरांची व आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेदरम्यान अचानक उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर त्वरित उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथक व औषधांची सोय करण्यात आली होती.
यासोबतच भाविकांसाठी महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सेवा बजावत कार्यक्रम यशस्वी केला.
तसेच धार्मिक वातावरणात भागवत कथांचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन, प्रवचन आणि भजनांच्या माध्यमातून परिसर भक्तीमय झाला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात्रा उत्साहात आणि शांततेत पार पडली असून आयोजकांनी सर्व व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.






