Home / Uncategorized / शेतकरी कुटुंबातील दीपक पाटील यांची मुंबईत पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती; जिद्द, मेहनत आणि स्वअभ्यासाचे यशस्वी उदाहरण…

शेतकरी कुटुंबातील दीपक पाटील यांची मुंबईत पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती; जिद्द, मेहनत आणि स्वअभ्यासाचे यशस्वी उदाहरण…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधि गोकुळसिग राजपूत 

कोणताही क्लास न लावता एमपीएससी परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश; फत्तेपूरच्या सुपुत्राचा प्रेरणादायी प्रवास युवकांसाठी आदर्श

 

फत्तेपूर जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे फत्तेपूर येथील श्री. दीपक संगीताबाई-भगवान पाटील. शेतकरी कुटुंबातील या होतकरू युवकाची मुंबई शहर येथे पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर नियुक्ती झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये प्रेरणेचा नवा संदेश पोहोचला आहे.

फत्तेपूर (ता. जामनेर) येथील रहिवासी असलेल्या दीपक पाटील यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, फत्तेपूर येथे झाले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मेहनत, शिस्त आणि अभ्यासू वृत्ती जपली. आपल्या यशामागे शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे ते आवर्जून सांगतात.

दहावीनंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर येथून विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जळगाव येथील एम. जे. कॉलेजमधून गणित विषयात एम.एस्सी. पदवी संपादन केली. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट निवडली. आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवत कोणत्याही खासगी क्लासचा आधार न घेता घरी राहूनच स्वअभ्यासाच्या जोरावर एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

अनेक युवक महागड्या क्लासेस आणि मार्गदर्शन संस्थांवर अवलंबून असताना दीपक पाटील यांनी आत्मविश्वास, नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर दुसऱ्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांची साथ, स्वतःची मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा हे महत्त्वाचे घटक ठरले.

सन २०२५-२६ बॅचसाठीचे बारा महिन्यांचे कठोर आणि खडतर पोलीस प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी शारीरिक, मानसिक आणि प्रशासकीय कौशल्यांचा उत्कृष्ट समन्वय साधत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुंबई शहर येथे पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या युवकाने कठोर परिश्रम, स्वअभ्यास आणि आत्मविश्वासाच्या बळावर मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना दीपक पाटील यांचा प्रवास नवचैतन्य देणारा ठरत आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आनंदा वारंगणे मोलखेडा, शिक्षकवृंद, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर ते पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार