Home / Uncategorized / टिटवी-पळसखेडा येथे रस्ता व पुलाचे काम आता दर्जेदार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

टिटवी-पळसखेडा येथे रस्ता व पुलाचे काम आता दर्जेदार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | गोकुळसिंग राजपूत

बातमी प्रसिद्ध होताच अभियंते व ठेकेदार झाले सक्रिय; अंदाजपत्रकानुसार काम सुरू

पाहणीनंतर भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची समाधानकारक प्रतिक्रिया

सोयगाव तालुक्यातील टिटवी-पळसखेडा परिसरात लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ता व पुलाच्या कामाबाबत यापूर्वी विविध तक्रारी व नाराजी व्यक्त करण्यात येत होती. कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाचे अभियंते व ठेकेदार यांनी तातडीने दखल घेत कामावर प्रत्यक्ष उपस्थित राहून अंदाजपत्रकानुसार आणि तांत्रिक निकषांनुसार काम सुरू केले आहे.

टिटवी गावातील अंतिम संस्कार भूमीजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असून रस्त्याची उंची, रुंदी व लांबी याबाबत आवश्यक निकषांचे पालन करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या कामाबाबत सध्या कोणतीही ठोस तक्रार नसल्याचेही सांगण्यात आले.

याच मार्गावरील पुलाच्या बांधकामातही दर्जेदार खडी, रेती व इतर साहित्याचा वापर करण्यात येत असून कामाची गुणवत्ता सुधारल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. या रस्ता व पुलाच्या कामामुळे परिसरातील सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक, दळणवळण व शेतीकामासाठी मोठा फायदा होणार आहे.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप देशमुख, सुनील चोरमारे, विजय काळे तसेच माजी चेअरमन प्रमोद पाटील यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर काम अंदाजपत्रकानुसार व समाधानकारक दर्जाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कामामध्ये पारदर्शकता राखून गुणवत्तापूर्ण बांधकाम करण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेला करण्यात आले.

टिटवी-पळसखेडा परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनीही सुधारित कामाबद्दल समाधान व्यक्त करत काम पूर्ण झाल्यानंतर परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार