Home / Uncategorized / ऑनलाईन खत बुकिंगला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सोयगाव कृषी विभागाचा जोरदार प्रचार…

ऑनलाईन खत बुकिंगला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सोयगाव कृषी विभागाचा जोरदार प्रचार…

 संभाजीनगर प्रतिनिधी | गोकुळसिंग राजपूत

FFS ॲपमुळे घरबसल्या खत आरक्षणाची सुविधा; वेळ, श्रम आणि खर्चाची बचत:भारत कासार याची माहिती 

सोयगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने खत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाच्या वतीने ऑनलाईन खत बुकिंग सुविधेचा जोरदार प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी भारत कासार व कृषी अधिकारी रमेश गुंडले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना Framework for Fertilizer Sale (FFS) ॲपची माहिती देऊन आगाऊ खत नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलद्वारे खताची आगाऊ नोंदणी करून आवश्यक खत आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे कृषी सेवा केंद्रांवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होत असून खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होत आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होण्याची खात्री मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

निंबायती येथील शेतकरी राहुल सुभाष गिरी यांनी FFS ॲपच्या माध्यमातून खताची आगाऊ नोंदणी केली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “माझे खत यशस्वीरित्या बुक झाले असून उद्या मला निश्चितपणे खत मिळणार असल्याचा विश्वास वाटत आहे. पूर्वी खतासाठी कृषी सेवा केंद्रांवर जाऊन तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. अनेकदा रांगेत उभे राहूनही खत मिळेल याची खात्री नसत. मात्र आता मोबाईलवरून काही मिनिटांत नोंदणी करून खत आरक्षित करता येत असल्याने वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची मोठी बचत होत आहे.”

खरीप हंगामात खतांची मागणी वाढत असताना ऑनलाईन नोंदणीमुळे खतांचे नियोजनबद्ध वितरण करणे शक्य होत आहे. कृषी विभागाकडून गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना ॲपचा वापर, नोंदणी प्रक्रिया आणि त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत आहेत.

शेतकरी राहुल गिरी यांनी पुढे सांगितले की, “हे ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर आहे. मात्र खत वितरणाच्या वेळी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांवर इतर कोणत्याही वस्तू किंवा सेवांची सक्ती होऊ नये. शासनाने सुरू केलेली ही पारदर्शक आणि शेतकरीहिताची व्यवस्था कायम राहावी, हीच अपेक्षा आहे.”

दरम्यान, कृषी विभागाच्या या अभिनव उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामासाठी आवश्यक खत उपलब्धतेचे नियोजन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होत आहे. ऑनलाईन खत बुकिंग सुविधेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार