छत्रपती संभाजीनगर(छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार)
दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अस्मानी संकटामुळे पैठण, वैजापूर, गंगापूर तालुक्यांत पिकांचे, फळबागांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर निसर्गाच्या या तांडवामुळे बळीराजा संपूर्णपणे कोलमडला आहे.

पैठण तालुक्यातील पाचोड, दावरवाडी, हर्षी आणि दादेगाव लिंबगाव शिवारात शनिवारी दुपारी वादळवाऱ्याने प्रचंड थैमान घातले. दावरवाडी फाट्यानजीक मुख्य वीजवाहिनीचे पोल कोसळल्याने पाचोडसह परिसरातील ७ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. वादळाचा मोठा फटका दादेगाव बुद्रुक येथील शेतकरी दीपक हजारे यांना बसला; त्यांची सुमारे १,१०० झाडांची उभी केळीची बाग जमिनीवर आडवी झाली.
उसनवारी आणि व्याजाने पैसे काढून उभी केलेली बाग नष्ट झाल्याने हजारे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. तसेच दावरवाडी येथे जालिंदर जोगदंड यांच्या नवनिर्मित रमाई आवास योजनेच्या घराच्या स्लॅबवर शेजाऱ्याचे पत्र्याचे शेड उडून पडल्याने मोठे नुकसान झाले. लिंबगाव परिसरात शांताबाई हिंगले, ऋषिकेश हिंगले, बंडू श्रीरंग हिंगले ,वसंतराव पवार, रामेश्वर पडुळे यांच्यासह अनेकांचे सौर (सोलार) पॅनेल्स उडून गेले, तर डाळिंबाच्या बागांचेही नुकसान झाले. पंचनामे करण्याची मागणी. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सर्व क्षेत्राचे महसूल व कृषी प्रशासनाने तातडीने संयुक्त पंचनामे करावे व पीडित शेतकरी व नागरिकांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे






