छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
दोन आरोपी अटकेत; ३ लाख २७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त • सिल्लोड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सिल्लोड शहरात घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत सिल्लोड शहर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मुंबई आणि भुसावळ येथील दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे असा ३ लाख २७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सिल्लोड शहर पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी सौ. संगीता राजेंद्र साळवी (रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड) यांच्या राहत्या घरात दि. २४ जुलै २०२६ रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण ७ लाख १६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती तसेच स्थानिक माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यात आली. पोलिसांच्या नियोजनबद्ध आणि अचूक तपासामुळे अवघ्या काही तासांत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
सुरेश अशोक भोंगे ऊर्फ मोहम्मद फरान शेख ऊर्फ सुरेश भांगा, रा. रजिया टॉवर, पापानगर, भुसावळ.
अब्दुल रफीक हमीद अन्सारी, रा. हनुमान नगर, गोरेगाव (पूर्व), मुंबई.
आरोपींकडून ३ लाख २७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. चोरीस गेलेल्या उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनयकुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलीस उपनिरीक्षक कायंदे, पोलीस उपनिरीक्षक साळवी, पोलीस अंमलदार योगेश मोकळे, हेड कॉन्स्टेबल मंगेश राठोड, पोलीस शिपाई बाबासाहेब राठोड, हेड कॉन्स्टेबल लोधवाल आणि पोलीस शिपाई आनंद पगारे यांनी मोलाची भूमिका बजावली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे करीत आहेत.
चौकट : सिल्लोड पोलिसांची तत्परता पुन्हा सिद्ध घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत दोन आरोपींना जेरबंद करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात सिल्लोड शहर पोलिसांना यश आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांनीही पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे.






