छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार
दि. 24 जुलै : माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागांतर्गत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे माननीय अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक, पैठण येथे महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना प्रपाठक डॉ. गौतम सव्वाशे यांनी महाआरोग्य शिबिरामागील उद्देश, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध आरोग्य सेवा तसेच विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचारांची सविस्तर माहिती उपस्थित रुग्ण व नागरिकांना दिली.
यावेळी राज्य कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगरचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी कर्करोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, लवकर निदानाचे महत्त्व आणि आधुनिक उपचारपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांमध्ये जनजागृती केली.
महाआरोग्य शिबिरास भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव श्रीमती रेखाताई कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पैठण शहराध्यक्ष श्री. जितू परदेशी तसेच नगरसेवक श्री. बजरंग लिंबोरे यांनी भेट देऊन उपस्थिती दर्शविली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे कौतुक केले आणि नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील अस्थिरोग विभागाचे डॉ. अनिल धुळे व त्यांचे सहकारी, नेत्ररोग विभागाचे डॉ. तपन जक्कल व त्यांचे सहकारी, राज्य कर्करोग रुग्णालयातील प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. खाडीलकर व टीम, गायनॅकॉलॉजी ऑन्कॉलॉजी विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड व त्यांचे सहकारी तसेच बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले.
महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण सुमारे 100 रुग्णांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. आवश्यक रुग्णांना औषधोपचार, समुपदेशन तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. पंडित किल्लारीकर, डॉ. रवी राठोड, डॉ. सीमा साळवे, डॉ. विपुल दिवाण, डॉ. रामेश्वर कुऱ्हाडकर, श्री. बबलू गायकवाड, श्री. आदित्य लव्हगळे, श्रीमती मुंडे, श्रीमती उजागरे, श्रीमती खांडे, निलेश ब्रदर, रोहिणी सिस्टर, स्मिता सिस्टर, ज्योती सिस्टर, बडे ब्रदर, श्री. अमोल खामकर, श्री. पंकज खरे,वैशाली पाटील मॅडम, श्री. गजानन मुत्तलवार,, श्री. कामशेटटी,दिलीप साळुंके,योगीता पगारे, नकुल मरमट,आनंद मुंढे,मनिषा लामतुरे,तांबे ब्रदर,मनिषा सिस्टर,सुनिता खंडागळे सिस्टर, कु. Neha, तेजश्री मॅडम, पाराषर सर, गाडेकर सर, जाधव सर, तसेच ग्रामीण रुग्णालय प्रशिक्षण पथक येथील कर्मचारी व अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.






