Home / Uncategorized / नांदगाव तांडा येथे खरीप हंगाम जनजागृती शिबिर उत्साहात बियाणे उगवण क्षमता,…

नांदगाव तांडा येथे खरीप हंगाम जनजागृती शिबिर उत्साहात बियाणे उगवण क्षमता,…

  सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

बीजप्रक्रिया, बीबीएफ पद्धत व संतुलित खत व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

आत्मा प्रकल्पांतर्गत विविध कृषी मोहिमांचा प्रचार; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोयगाव तालुक्यातील नांदा गाव तांडा येथे सोयगाव कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग व आत्मा प्रकल्पाच्या वतीने सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे खरीप हंगाम जनजागृती व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेतीच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन अधिक उत्पादनक्षम व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

प्रकल्प संचालक आत्मा छत्रपती संभाजीनगर धनश्री जाधव तसेच प्रकल्प उपसंचालक आत्मा डॉ. अभयकुमार पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल माहिती देण्यात आली.

यावेळी अमोल महाजन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सोयगाव यांनी शेतकऱ्यांना बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, बीबीएफ (ब्रॉड बेड अँड फरो) पद्धतीने पेरणी, संतुलित खत व्यवस्थापन तसेच ऑनलाईन खत बुकिंग ॲपच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घेतल्यास निकृष्ट बियाण्यांमुळे होणारे नुकसान टाळता येते. तसेच बीजप्रक्रिया केल्याने बुरशीजन्य व किडजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

तसेच बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, पाण्याचा निचरा सुरळीत होतो आणि पिकांच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण होते. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत ही पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शेतकऱ्यांना संतुलित खत वापराचे महत्त्व, मृदास्वास्थ्य जपण्याचे उपाय, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कार्यरत कृषी सखी यांनीही नैसर्गिक शेतीच्या संकल्पना व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास गावाचे सरपंच, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कार्यरत कृषी सखी, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. त्यामुळे हे शिबिर ज्ञानवर्धक व उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या मार्गदर्शन शिबिरांमुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन उत्पादनवाढीस चालना मिळणार असल्याचा विश्वास कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार