छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात सध्या शेतकऱ्यांनी पेरणी साठी सध्या घाई करू नये असे शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी सभापती धरमसिंग चव्हाण आवाहन यांनी केले आहे राज्यातील विविध भागांत १ जूनपासून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी हा पाऊस मान्सूनचा नाही असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नये, असे सभापती धरमसिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. सध्या नैऋत्य मान्सून अद्याप केरळ किनारपट्टीपर्यंत पोहोचलेला नसून, महाराष्ट्रात त्याच्या आगमनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. उपलब्ध हवामान अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांत किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ
वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या पावसामुळे वातावरणातील उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञानी व्यक्त केली आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, मान्सूनपूर्व वादळी पाऊस हा बहुतांश वेळा तात्पुरता आणि अनियमित स्वरूपाचा असतो. अशा पावसावर आधारित पेरणी केल्यास नंतर दीर्घ खंड पडल्यास बियाण्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता, मान्सूनची नियमित आणि स्थिर सुरुवात झाल्यानंतरच
शेतीकामांचे नियोजन करावे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांच्या पेरणीसाठी पुरेसा ओलावा आणि सातत्यपूर्ण पाऊस आवश्यक असतो. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Hichkis वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह शेतकऱ्यांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे. शेतात काम करताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच पाळीव जनावरे उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी बांधावीत. वीज पडण्याच्या घटनांपासून बचावासाठी हवामान विभागाच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख धरमसिंग चव्हाण नांदा तांडा ता सोयगाव यांच्या कडून करण्यात आले आहे. राज्यातील हवामान सध्या बदलत्या स्थितीत असून, काही भागांत पाऊस तर काही भागांत उष्णतेची लाट अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी अधिकृत हवामान अंदाजांवर लक्ष ठेवूनच पुढील नियोजन करावे, असे तज्ज्ञानी म्हटले आहे. ‘मान्सूनपूर्व पावसाला भुलू नका, स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणी करा,’ असा स्पष्ट संदेश चव्हाण यांनी दिला आहे.






