छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन; बुलढाण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमास राहणार उपस्थित
प्रा. राम शिंदे यांचा बुलढाणा
जिल्हा दौरा; शेगाव व बुलढाण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती
बुलढाणा, दि. २ जून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे गुरुवार, दि. ४ जून रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शेगाव व बुलढाणा येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. शिंदे हे बुधवार, दि. ३ जून रोजी रात्री मुंबई येथून रेल्वेने प्रस्थान करणार असून गुरुवारी पहाटे ५.४० वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार आहे. आगमनानंतर ते भक्तनिवास येथे अल्प विश्रांती घेऊन सकाळी ८ वाजता संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेणार आहेत. संतांच्या चरणी नतमस्तक होत राज्याच्या प्रगतीसह जनकल्याणासाठी प्रार्थना करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यानंतर ते बुलढाणा शहराकडे रवाना होतील. बुलढाणा शहरातील तहसील चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम नंदू लवंगे व समाजबांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव, त्यांचे समाजोन्नतीचे विचार आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श यावर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सभापती प्रा. राम शिंदे यांचे भाषण हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे जयंती सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
कार्यक्रमानंतर प्रा. शिंदे हे पुढील नियोजित दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन आणि आयोजकांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती बुलढाणा येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. शरद जुमडे यांनी दिली. त्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.





