चिखली : उमा जैवाळ
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध व्हावे या मागणीसाठी युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर व सरपंच सचिन कदम यांनी 25/05/2026 रोजी चिखली-जालना हायवेवर ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, चिखली यांनी दि. 24/05/2026 रोजी लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्रानुसार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्यामुळे प्रस्तावित आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेली लेखी आश्वासने:
1. प्राधान्याने डिझेल पुरवठा: चिखली तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शेती कामासाठी येणाऱ्या शेतकरी व ट्रॅक्टर धारकांना प्रथम प्राधान्याने डिझेल दिले जाईल. डिझेल मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. दोन दिवसात परिस्थिती पूर्वत झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या कॅन मध्ये सुद्धा डिझेल देण्यास संदर्भातल्या अटी शिथिल केल्या जातील. अशी ग्वाही देण्यात आली
2. पुरवठ्यात वाढ: पेट्रोल पंप धारकांना नियमितपणे मिळणाऱ्या डिझेलच्या नियतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 25 /05/026 रोजी एकत्रित 12 टँकर डिझेल चिखली मध्ये उपलब्ध केल्या जाणार आहे
3. कडक अंमलबजावणी: शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या किंवा डिझेल देण्यास नकारणाऱ्या पंप चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर एक पोलीस व एक महसूल कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.
तहसीलदारांनी पत्रात नमूद केले आहे की, शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, रास्ता रोको आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिक, रुग्णवाहिका व वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा व प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचा विचार करून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली होती.
प्रशासनाच्या या सकारात्मक लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अडचण आल्यास थेट तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी संतोष पाटील भुतेकर, शेतकरी नेते विनायकराव सरनाईक मंडपगाव सरपंच सचिन भाई कदम फिरोज पठाण रवी भाऊ टाले देशोन्नतीचे पत्रकार समाधान भाऊ गाडेकर ऋषी पाटील भोपळे व इतर सहकारी उपस्थित होते
संतोष पाटील भुतेकर
युवा सेना उपजिल्हाप्रमुख, बुलढाणा





