छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश; दत्तात्रय गोसावी यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
सिन्नर तालुक्यातील बारा गाव पिंपरी येथे वाढदिवस म्हटला की केक, फटाके आणि विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. मात्र समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा जपत श्री दत्तात्रय गोसावी यांनी आपल्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण मंदिर, सिन्नर येथे नागरिकांना २०० कापडी पिशव्यांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
सध्या देशभरात एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकवर केंद्र व राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्लास्टिकमुळे वाढणारे प्रदूषण, पर्यावरणाची होणारी हानी आणि जनावरांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता शासनाकडून कापडी व पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर दत्तात्रय गोसावी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. प्लास्टिक पिशव्या वापरल्यानंतर अनेकदा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकल्या जातात. या पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्यास त्यांना गंभीर आजार होतात, तसेच अनेक जनावरांचा मृत्यूदेखील होतो. प्लास्टिक सहज नष्ट होत नसल्याने गाव, शहर आणि परिसरात कचऱ्याचे ढीग निर्माण होऊन प्रदूषणात भर पडते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी स्वतःहून पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्याचा आदर्शही निर्माण झाला आहे. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत दत्तात्रय गोसावी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी हर्षदजी देशमुख (उपनगराध्यक्ष, सिन्नर नगर परिषद), घनश्याम पुजारी, महेश कपूर, दत्ता जोशी, जालिंदर गोसावी, गोपीचंद गोसावी, विष्णू गोसावी, नारायण संत, पांडुरंग संत, ज्ञानेश्वर धात्रक, सागर गोसावी, सार्थक गोसावी, जिजाबाई धात्रक, मिराबाई गोसावी, माधुरी गोसावी, पूजा गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दत्तात्रय गोसावी यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण मंदिर, सिन्नर येथे नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करताना मान्यवर.






