चिखली : प्रतिनिधी
शहरातील तीव्र पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा आणि ढासळलेल्या स्वच्छता व्यवस्थेविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रशासनाला जाब विचारला.
सध्या चिखली शहरात तब्बल १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. प्रचंड उन्हाळा, वाढते तापमान आणि पाण्याअभावी महिलांसह नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक भागांत नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासन ढिम्म असल्याचा संतप्त आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला.
शहरात सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून मुख्य पाइपलाईनचे काम रखडल्याने संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. करोडो रुपयांची योजना असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्थेचाही पूर्णपणे बोजवारा उडाला असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा गाड्यांचे अपुरे नियोजन, सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
“जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका; तात्काळ उपाययोजना करा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.
या निवेदनावर डॉ. इसरार, डॉ. निलेश गावंडे, डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. अमोल लहाने, श्री. गोकुळ शिंगणे, श्री. गोपाल देव्हडे, श्री. रत्नदीप शिनगारे, श्री. उबेद अली खान, श्री. आनंद बोन्द्रे, श्री. प्रशांत भटकर, श्री. संतोष देशमुख, श्री. पी. एस. वायाळ, श्रीमती सुनीता प्रकाश शिंगणे, सौ. सीमा गोपाल देव्हडे, सौ. सुप्रिया प्रशांत भटकर, सौ. शीतल संतोष देशमुख, सौ. सरस्वती पुरुषोत्तम वायाळ, श्री. मोहम्मद आसिफ व श्री. समीर जकौऊला आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
काँग्रेस नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून नागरिकांनीही या आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शविला आहे.






