Home / Uncategorized / सिल्लोड हादरले! सराफा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; २० लाखांचा ऐवज लुटून चोरटे पसार…

सिल्लोड हादरले! सराफा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; २० लाखांचा ऐवज लुटून चोरटे पसार…

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

खुल्लोड घाटात दबा धरून बसलेल्या दोन चोरट्यांचा थरार; चाकूचे सहा वार करून व्यापाऱ्याला रक्तबंबाळ केले, पोलिसांची विशेष पथके शोधासाठी रवाना

सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड घाट परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सराफा व्यापाऱ्यावर चाकूने सपासप वार करून तब्बल २० लाख रुपयांचे दागिने व रोकड लुटून दोन चोरटे जंगलाच्या दिशेने पसार झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नितीन सोनाजी निकम (रा. पालोद, ता. सिल्लोड) यांचे अंभई येथे सोने-चांदीचे दुकान असून बुधवारी सायंकाळी ते अंभईहून उंडणगावकडे दुचाकीने जात होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास खुल्लोड घाट परिसरात आधीपासून दबा धरून बसलेल्या दोन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत दागिने व रोकड असलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र नितीन निकम यांनी प्रतिकार करताच संतप्त झालेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यावर व शरीरावर चाकूचे सपासप सहा वार केले. गंभीर जखमी झाल्याने निकम रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. त्यानंतर चोरट्यांनी २० लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग घेऊन जंगलाच्या दिशेने पलायन केले. विशेष म्हणजे, पळून जाताना चोरट्यांनी स्वतःची दुचाकी घटनास्थळीच सोडून दिली.

घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या निकम यांनी नातेवाइकांना माहिती दिली. नातेवाइक व स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. चोरटे ज्या दिशेने पसार झाले त्या दिशेने नागरिकांनी पाठलागही केला, मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.

घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी चोरट्यांची दुचाकी जप्त केली असून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. गंभीर जखमी नितीन निकम यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी सपोनि अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार