छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
तरुणांचे शक्ती प्रदर्शन, जयघोषाने दुमदुमला परिसर ; शंभूराजांना सावळदबारातून मानाचा मुजरा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सावळदबारा येथे मोठ्या उत्साहात साजरी
भव्य मिरवणूक, तरुणांचे शक्ती प्रदर्शन आणि जयघोषाने परिसर दुमदुमला
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे धर्मवीर संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’ तसेच ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
“या भूमंडळाचे ठाई, स्वराज्य रक्षी ऐसा नाही… स्वराज्य राहिले काही, तुम्हा करणी…” अशा घोषवाक्यांनी आणि शंभूराजांच्या पराक्रमाच्या स्मरणाने वातावरण भारावून गेले होते. धर्मवीर संभाजी महाराजांच्या अदम्य शौर्याला मानाचा मुजरा देण्यासाठी ग्रामस्थ, युवक, बालगोपाल तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व शिवप्रेमींनी पुष्पगुच्छ अर्पण करून शंभूराजांना अभिवादन केले.
सायंकाळी सहा वाजेपासून गावातून भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज, आकर्षक रोषणाई आणि घोषणांनी मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील विविध चौकांमध्ये बालगोपाल आणि युवकांनी मुद्दल फिरवून तसेच विविध कसरती सादर करून शक्ती प्रदर्शन केले. या थरारक सादरीकरणामुळे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात दाद दिली.
मिरवणूक संपूर्ण गावभर फिरल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
दरम्यान, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सपोनि प्रफुल्ल साबळे फर्दापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील, बिट जमादार मिरखा तडवी, शिवदास गोपाळ, कृष्णा इंगळे, सोनवणे साहेब तसेच पोलिस पाटील विलास कुल्ले यांनी दक्षता घेत शांततेत कार्यक्रम पार पाडला.






