छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी : श्रीपत पवार
लातूर : दि. १० मे रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या बौद्ध साहित्य संमेलनामध्ये सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोळी बोडखा येथील पदवीधर शिक्षिका सौ. सविता बाळासाहेब जगताप यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर “शिक्षण रत्न” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जडणघडण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संस्कारमूल्य शिक्षण तसेच प्रात्यक्षिकांसह शिक्षण यांसारखे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोळी बोडखा येथील मराठी व उर्दू या दोन्ही माध्यमातील सर्व शिक्षक-शिक्षिका, मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तसेच, या साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीत सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल आणि शासकीय सेवेत कार्यरत राहून वैयक्तिक वेळेत सामाजिक कार्यात योगदान दिल्याबद्दल आयु. नितीन भागवत गायकवाड यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.
संमेलनात विविध परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन तसेच सामाजिक विषयांवरील विचारमंथनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. अनेक साहित्यिक, विचारवंत आणि साम उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.
या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रशांत गायकवाड (बौद्ध साहित्य अभ्यासक) यांनी मार्गदर्शन केले. स्वागताध्यक्ष म्हणून मा. चंद्रकांत शिंदे (माजी नायब तहसीलदार), उद्घाटक म्हणून जयश्रीताई सोनकांबळे (महापौर, लातूर महानगरपालिका), तर संयोजक म्हणून राजेंद्र कांबळे (संपादक, अर्थसत्ता न्यूज) यांनी भूमिका पार पाडली. यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता नितीन गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन मंगलताई कांनी केले.






