छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
चिखली तालुक्यातील केळवद येथील विश्वकर्मा सॉमिलवर वन विभागाने सोमवारी (१२ मे) सकाळी ११ वाजता धाडसी कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांचा अवैध सागवान, खैर, कडू निम व कट साइज लाकूडसाठा जप्त केला. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सॉमिल सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात काही सॉमिलमध्ये वन विभागाची परवानगी न घेता अवैधपणे लाकूड कटाई सुरू असल्याची गोपनीय माहिती उप वनसंरक्षक श्री. जमीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथकासह केळवद येथील विश्वकर्मा सॉमिलवर धाड टाकली.
कारवाईदरम्यान सागवानाचे ६७ नग (घ.मी. ३.५६५) किंमत २ लाख ५१ हजार ५७८ रुपये, साग चौरस १०१ नग किंमत ५ लाख रुपये तसेच अडजात लाकूड अंदाजे २ लाख ५० हजार रुपये असा एकूण जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित लाकडाबाबत परवाना विचारला असता कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत.
वन विभागाने जप्त केलेला मुद्देमाल बुलढाणा येथील लाकूड आगारात जमा केला असून विश्वकर्मा सॉमिलचे मालक संजय शर्मा यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सुनील वाकोडे करीत आहेत.
सदर कारवाई मुख्य वनसंरक्षक श्रीमती ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली उप वनसंरक्षक श्री. जमीर शेख यांच्या उपस्थितीत पार पडली. कारवाईमध्ये वनपाल श्री. प्रदीप प्रकाश मुंढे, वनरक्षक श्री. समाधान झोटे, श्री. गजानन शिंदे, श्री. नितेश गवई, कु. सरोदा कराड, श्री. विक्रम राऊत, श्री. गजानन पोटे, वाहन चालक संदीप मडावी तसेच वनमजूर दीपक सोनवणे, रवींद्र तायडे, अमोल चव्हाण, पवन वाघ, आकाश शिरसाट, अंकुश गायकवाड आणि पवन गायकवाड यांनी सहभाग घेतला.






