छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, विषप्रयोग की नैसर्गिक मृत्यू ? तपास सुरू
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथून दोन किमी अंतरावर असलेल्या देव्हारी शिवारात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतात कामासाठी गेलेल्या नागरिकांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. ही माहिती मिळताच अजिंठा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृत बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या गंभीर जखमा दिसून न आल्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विषप्रयोग, विजेचा धक्का, अंतर्गत आजार किंवा नैसर्गिक मृत्यू अशा अनेक शक्यता अजिंठा वनविभागाकडून तपासल्या जात आहेत. असे अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष दोडके यांनी बोलताना सांगितले आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती अजिंठा वनविभाग सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.
अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व वन्यप्राण्यांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष दोडके यांनी केले आहे
दरम्यान, वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने ही घटना गंभीर मानली जात असून बिबट्याच्या मृत्यूमागील सत्य समोर येण्यासाठी अजिंठा वनविभागाकडून सखोल चौकशी सुरू करण्यात येणार आहे योग्य ती कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष दोडके यांनी बोलताना सांगितले आहे






