जळगाव ब्युरो चीफ गोकुळसिंग राजपूत जळगाव
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजून किती जणांचा बळी घेणार गतिरोधकांची मागणी
पहूर ता जामनेर
जळगाव छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पिकप वाहनाने उभ्या सेंट्रो कारला दिलेल्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास म्हाडा वसाहती समोर घडली.
छत्रपती संभाजीनगर कडून जळगाव कडे भरधाव येणाऱ्या पिकप (क्र. एम . एच . १९ सी वाय ९२ ० २ ) वाहनाने उभ्या असलेल्या सँट्रो (क्र. एम . एच . ०४ एफ ए ८० ४१ ) कारला मागून जोरदार धडक दिल्याने कार जवळ उभ्या असलेल्या अमिनोद्दीन शेख कमारुद्दीन ( वय ४७ ) यांनी जीव वाचविण्यासाठी रस्त्याच्या कडेला धाव घेताच त्यांच्यावरच पिकप उलटली आणि दबलेल्या अवस्थेतच त्यांचा छातीला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
तसेच त्यांच्यासोबत असलेले सलीम अनिस शेख यांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जळगाव येथे उपचार अर्थ दाखल करण्यात आले आहे .
आजूबाजूच्या लोकांनी अमिनोद्दीन शेख यांना पिकप खालून काढले . त्यांच्यासह जखमी सलीम अनिस शेख यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. तसेच दुखापत झालेले सलीम अनिस शेख यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान पिकप चालक घटनास्थळावरून पसार झाला
असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अपघात स्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. जळगाव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा झाला की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अजून किती जणांचा बळी घेणार ? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी संतप्त नागरिकांना शांत करत उद्या सकाळी आपण संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधूया. पोलीस प्रशासनाच्या सूचनेचा मान राखून महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्यासह पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. जखमी सलीम अनिस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
उद्या अंत्यसंस्कार
सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मयत अमीनुद्दीन यांच्या मागे पत्नी , दोन मुले, तीन मुली ,आई , सून ,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यू हळहळ व्यक्त होत आहे . या घटने बद्दल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे शहर प्रमुख ईश्वर हिवाळे यांनी शोक व्यक्त केला.






