छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत
महाराष्ट्र दिनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला सन्मान; उल्लेखनीय सेवेला मानाचा मुजरा
वैजापूर : येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व धाडसी पोलीस निरीक्षक सिंघम सत्यजित ताईतवाले यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस महासंचालक (DGP) पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करुन गौरविण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक ताईतवाले यांनी आपल्या सेवाकाळात विविध संवेदनशील व आव्हानात्मक ठिकाणी कार्य करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. विशेषतः गडचिरोलीसारख्या नक्षलप्रवण व अतिसंवेदनशील भागात त्यांनी धाडसाने कर्तव्य पार पाडत अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये सहभाग घेतला. कठीण परिस्थितीतही त्यांनी धैर्य, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम केले, यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे.
तसेच मुंबई येथे गुन्हे शाखेत (क्राईम ब्रँच) कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर व गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली. तपास कौशल्य, माहितीचे अचूक विश्लेषण आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याची त्यांची क्षमता यामुळे अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी निकाल लागले आहेत.
वैजापूर येथे कार्यरत असताना देखील त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांशी सुसंवाद साधत पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण केला आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, तक्रारींचे तत्काळ निवारण करणे आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या सर्वांगीण व उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली असून, त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा म्हणून पोलिस महासंचालक पदक जाहीर करुन प्रधान करण्यात आले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे वैजापूर तालुक्यासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याप्रसंगी उपसंपादक गोकुळसिंग राजपूत यांनी शुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.






