छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
केजी ते पीजी विस्तार घडवणारे शिक्षणसेवक सेवानिवृत्त; वाढदिवसानिमित्त दुहेरी सन्मान
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था, सावळदबारा संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक तथा प्राचार्य एन आर कोलते पाटील यांनी तब्बल ३७ वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर दि .१/५/२६ शुक्रवार रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने हा क्षण संस्थेसाठी दुहेरी आनंदाचा ठरला.
सन १९९० साली मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने कार्य केले. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला, गुणवंत निकालांची परंपरा निर्माण झाली तसेच गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज आयटी अभियंते, डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस व विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी मुख्याध्यापक म्हणूनच नव्हे तर संस्थेच्या कर्त्या-धर्त्या सदस्याप्रमाणे जिव्हाळ्याने कामकाज पाहिले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेने पाचवी ते दहावी या मर्यादेतून पुढे जात केजी ते पीजी असा लक्षणीय विस्तार साधला.
देव्हारी व मोलखेडा येथेही विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी त्यांनी पुढाकार घेत शाळा सुरू करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे त्यांची ओळख संपूर्ण तालुक्यात एक आदर्श शिक्षणसेवक म्हणून निर्माण झाली असल्याचे असे मत प्रा जीवन कोलते पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवृत्तीमुळे शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, त्यांनी पुढील काळातही आपल्या मार्गदर्शनातून संस्थेला दिशा द्यावी, अशी अपेक्षा संस्था अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील यांच्या कडून व्यक्त करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांनी त्यांचे कार्य अमूल्य असल्याचे सांगत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.






