छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत)
एटीएम चोरीसह गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; 311 बक्षिसांनी गौरवलेले मोरे यांचे कर्तृत्व ठरले अधोरेखित
छत्रपती संभाजीनगर;कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि तपास कौशल्याचा ठसा उमटवणारे सहायक पोलीस निरीक्षक भरत उत्तम मोरे डोणगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा ह.मु . छत्रपती संभाजीनगर यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांकडून प्रदान करण्यात येणारे ‘डीजी पोलीस पदक’ आज (दि. 1 मे 2026) पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते बहाल करण्यात आले. जवळपास दोन दशकांच्या सेवेत त्यांनी उभारलेले कार्य हे पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
दि. 13 जून 2006 रोजी पोलीस सेवेत दाखल झालेल्या मोरे यांनी 19 वर्षे 10 महिने 17 दिवसांची प्रदीर्घ सेवा बजावताना विविध जिल्ह्यांमध्ये जबाबदारी सांभाळली. सध्या ते छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत असून प्रशासनिक कामकाजातही त्यांनी तितकीच कार्यक्षमता दाखवली आहे.
अहिल्यानगरमधील नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव, धुळे शहर, बीड जिल्ह्यातील आष्टी व कडा, तसेच फर्दापूर व शिवूर या पोलीस ठाण्यांमध्ये प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी गुन्हे अन्वेषणात विशेष प्राविण्य मिळवले. शिवूर येथे एटीएम चोरी प्रकरणात पाच राज्यांत फरार असलेल्या अट्टल आरोपीला अटक करून तब्बल 15 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्याची धडाकेबाज कामगिरी त्यांनी केली.
कोपरगाव शहरात कार्यरत असताना घरफोडी प्रकरणातील आरोपीला नागपूर येथून अटक करून मध्यप्रदेशातील देवास येथून सुमारे 50 तोळे सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करत त्यांनी तपास कौशल्याची छाप पाडली. एकूण 300 हून अधिक गुन्ह्यांचा तपास पूर्ण करताना 9 खून प्रकरणांचा यशस्वी छडा लावणे ही त्यांच्या कारकिर्दीतील ठळक बाब ठरली आहे.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आजपर्यंत 311 बक्षिसे आणि 11 प्रशंसापत्रांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. प्रामाणिकपणा, कर्तव्यपरायणता आणि बारकाईने तपास करण्याची वृत्ती यामुळे मोरे यांनी पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या यशामुळे संपूर्ण विभागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






