Home / Uncategorized / वीट भट्टी मजुराच्या मुलीची महाराष्ट्र पोलीस दलाला गवसणी..

वीट भट्टी मजुराच्या मुलीची महाराष्ट्र पोलीस दलाला गवसणी..

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

शाईस्ता तडवी ठरली हिवरखेड्यातील पहिली महिला पोलीस

गुलालाची उधळण ; गावकऱ्यांनी काढली भव्य मिरवणूक

 

पहूर ता. जामनेर

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील तडवी महिला अठरा विश्व दारिद्र्य… घरात उपासमारीची वेळ… आई-वडील वीट भट्टीवर कष्ट करून संसाराचा गाडा ओढणारे… अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवणारी आणि त्या स्वप्नाला जिद्दीने साकार करणारी मुलगी म्हणजे शाईस्ता दादाराव तडवी!

 

सात बहिणींनंतर जन्मलेला भाऊ, घरची हलाखीची परिस्थिती—या सगळ्या संकटांनी तिचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आई-वडिलांनी मुलींच्या शिक्षणावर कधीच तडजोड केली नाही. “माझी मुलगी पोलीसच होणार!” हा विश्वास त्यांनी जपला आणि शाईस्तानेही त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही.

 

पोलीस होण्याचे स्वप्न मनात घट्ट रोवून शाईस्ता रोज रानवाटांवर धावण्याचा सराव करत होती. अभ्यासातही ती तितकीच हुशार होती. कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने पहिल्याच प्रयत्नात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात आपले स्थान निश्चित केले—आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही.

 

हिवरखेडा गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. गावातील पहिली महिला पोलीस म्हणून शाईस्ताने इतिहास रचला. तिच्या यशाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमानाश्रू दाटून आले.

 

शाईस्ता ही पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. २०२३ मध्ये तिने दहावी उत्तीर्ण केली. त्यानंतर बारावी विज्ञान शाखा पूर्ण करून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. शिक्षणासोबतच पोलीस भरतीसाठी ती अहोरात्र झटत राहिली—आणि अखेर तिच्या मेहनतीचे चीज झाले.

 

तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, क्रीडा विभाग प्रमुख हरीभाऊ राऊत, भगवान जाधव तसेच शिक्षकांनी तिच्या घरी जाऊन स्नेहवस्त्र, गुलाबपुष्प आणि पेढा भरवून तिचा व तिच्या आई-वडिलांचा सन्मान केला.

 

शाईस्ताची ही यशोगाथा केवळ एक बातमी नाही, तर प्रत्येक मुलीसाठी एक प्रेरणा आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयावर लक्ष केंद्रित करून जिद्दीने प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते—हेच शाईस्ताने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

 

गुलालाची उधळण ;गावातून भव्य मिरवणूक

 

शाईस्ता तडवी या विद्यार्थिनीची गावातून गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढली . आपल्या लेकीचं कौतुक होताना पाहून आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार