विविध मित्र मंडळांच्या पुढाकाराने जयंती सोहळा जल्लोषात; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
सोयगाव प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
मोलखेडा (ता. सोयगाव), दि. १८ एप्रिल २०२६ :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील भीमशक्ती मित्र मंडळ, शिव प्रतिष्ठान मित्र मंडळ, अब्दुल कलाम मित्र मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. समितीचे अध्यक्ष योगेश जाधव, उपाध्यक्ष गणेश जाधव व इतर सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांनी संविधान निर्माता महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची आठवण करून दिली. अध्यक्ष योगेश जाधव यांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत तरुणांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
सायंकाळी सहा वाजता गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजीत आणि विविध सजवलेल्या वाहनांसह मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. महिलांसह युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फर्दापूर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मिरखा तडवी व शिवदास गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कार्यक्रम शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडला.
एकूणच, मोलखेडा गावात डॉ. आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी होत सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.






