सोयगाव (प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत):
देव्हारी येथे 10 एप्रिलला शिबिर; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – उत्तम चव्हाण
सोयगाव महसूल विभागांतर्गत मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान 2026’ राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत देव्हारी येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विषयक समस्या तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.
सोयगाव तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित या शिबिरास सावळदबारा परिसरासह सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती उत्तम महारू चव्हाण यांनी केले आहे. नागरिकांच्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडता याव्यात आणि त्यावर तत्काळ निर्णय व्हावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या शिबिरासाठी राज्याचे महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन लाभणार असून, जिल्हाधिकारी विनय गौडा (भा.प्र.से) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्लोड उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण राहणार आहेत. तसेच सोयगाव तहसीलदार श्रीमती मनिषा मेने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हे शिबिर दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता देव्हारी येथील गजानन महाराज मंदिर सभामंडप (ग्रामपंचायत कार्यालयाजवळ) येथे पार पडणार आहे. महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकरणे, अर्ज, दाखले, तक्रारी यांचे निवारण या शिबिरात करण्यात येणार आहे.पुरवठा अधिकारी काकासाहेब सावळे,
मंडळ अधिकारी अरुण पंडित तसेच ग्राम महसूल अधिकारी तुषार नागपुरे, आकाश पिराने, वैभव जाधव, भगवान सोळंके आणि शंकर काळे यांनीही ग्रामस्थांना या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत, तर त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविल्या जाणार असल्याने या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा सभापती उत्तम महारु चव्हाण यांच्या कडून व्यक्त करण्यात येत आहे.





