Home / Uncategorized / दुसऱ्या डिजिटल शेतीशाळेलाही विक्रमी प्रतिसाद; हजारो शेतकऱ्यांचा जैविक शेतीकडे कल…!

दुसऱ्या डिजिटल शेतीशाळेलाही विक्रमी प्रतिसाद; हजारो शेतकऱ्यांचा जैविक शेतीकडे कल…!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | गोकुळसिंग राजपूत

कमी खर्च, जास्त उत्पन्नाचा मंत्र; डिजिटल शेतीशाळेतून शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे; कृषी अधिकारी भारत कासार

 

छत्रपती संभाजीनगर : कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘विशेष डिजिटल शेतीशाळा’ अभियानाच्या दुसऱ्या सत्रालाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला. दिनांक ८ एप्रिल रोजी पार पडलेल्या या सत्रात हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेत जैविक व नैसर्गिक शेतीचे महत्त्वपूर्ण धडे आत्मसात केले.
‘जैविक व नैसर्गिक निविष्ठा’ या विषयावर आधारित या प्रशिक्षण सत्रात बीजामृत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतींसह त्यांचा शेतीत प्रभावी वापर, फायदे आणि खर्चात होणारी बचत याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खतांच्या वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी या पर्यायी पद्धतीकडे मोठ्या उत्साहाने वळण्याची तयारी दर्शवली.
या डिजिटल शेतीशाळेला जिल्ह्यातील तब्बल २९० पोकरा गावांमधील ४००० हून अधिक शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, प्रकल्पाच्या कक्षेबाहेरील ५०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांनीही झूम व यूट्यूबच्या माध्यमातून या प्रशिक्षणात सहभाग घेतला. त्यामुळे या उपक्रमाचा विस्तार अधिक व्यापक होत असल्याचे स्पष्ट झाले.
या यशस्वी आयोजनामागे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी. आर. देशमुख, नोडल अधिकारी विशाल साळवे आणि उपविभागीय अधिकारी सुभाष आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी भारत कासार, मंडळ कृषी अधिकारी रमेश गुंडिले, कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक तसेच कृषी ताईंनी गावागावांत शेतकऱ्यांना एकत्र करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले.
या उपक्रमामुळे शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत असून, कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने जैविक शेती हा प्रभावी पर्याय ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, येत्या १५ एप्रिल रोजी ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन’ आणि २२ एप्रिल रोजी ‘आधुनिक शेती तंत्रज्ञान’ या विषयांवर होणाऱ्या पुढील सत्रांमध्ये अधिकाधिक शेतकरी बांधव तसेच महिला बचत गटांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोयगाव तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार