Home / Uncategorized / सिल्लोड तहसील कार्यालयात ACBचा सापळा; नायब तहसीलदारासह सेतू चालक रंगेहात जेरबंद…

सिल्लोड तहसील कार्यालयात ACBचा सापळा; नायब तहसीलदारासह सेतू चालक रंगेहात जेरबंद…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

ट्रॅक्टर सोडण्यासाठी २५ हजारांची मागणी; १५ हजारांवर सौदा ठरला अन्‌ ACBची धडक कारवाई

महसूल विभागात खळबळ; लाच घेताना १० हजारांसह सेतू चालक पकडला

नायब तहसीलदारावर कारवाईचा फास; मोबाईल व रोख जप्त, घरझडती सुरू

सिल्लोड तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी (दि. ६ एप्रिल २०२६) धडाकेबाज सापळा रचत नायब तहसीलदार हारून अजिज शेख व सेतू सुविधा केंद्र चालक युवराज अभिमान तायडे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार (वय ४५) हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने गौण खनिज (वाळू) वाहतूक करत होते. दि. ४ एप्रिल रोजी नायब तहसीलदार शेख यांनी त्यांचा ट्रॅक्टर अडवून “जास्त वाळू भरली” असा आरोप करत कारवाईची भीती दाखवली. जरी तक्रारदाराकडे वैध परवाना असला तरी ट्रॅक्टर सोडण्यासाठी तसेच पुढील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तब्बल २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने थेट ACBकडे धाव घेतली. दि. ६ एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता शेख यांनी २५ हजारांची मागणी करून ती १५ हजारांवर आणत तडजोड केल्याचे निष्पन्न झाले. यातील १० हजार रुपये सेतू चालक युवराज तायडे याच्याकडे देण्याचे सांगण्यात आले.

ACB पथकाने सापळा रचताच सेतू सुविधा केंद्रात तायडे याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर नायब तहसीलदार हारून शेख यांनाही तहसील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपींकडून लाच रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांच्या घरांची झडती सुरू आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून तपास पोलीस निरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे व उपअधीक्षक राजीव तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

👉 नागरिकांना आवाहन :

शासकीय कामासाठी कोणीही अधिकारी किंवा त्यांच्या वतीने लाच मागत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार