छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या हस्ते गौरव; विकासाभिमुख कामगिरीची अपेक्षा व्यक्त
सोयगाव!छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या हस्ते नूतन सभापतींचा भव्य सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहनही अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण व आरोग्य समिती सभापतीपदी सौ. अनिताताई ज्ञानेश्वर मोठे यांची निवड झाली असून त्यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्याचा संकल्प व्यक्त केला. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. मीनाक्षीताई किशोर पवार यांची निवड झाली असून महिला सक्षमीकरण, बालकांच्या पोषण व सुरक्षेसाठी ठोस उपक्रम राबविण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
तसेच अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी श्री. सचिन गरड यांची निवड झाली असून जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे, पायाभूत सुविधांची उभारणी आणि निधीचा योग्य वापर करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. बालाजी सोनटक्के यांची निवड झाली असून समाजातील वंचित घटकांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या सत्कार सोहळ्यावेळी नव्याने निवडून आलेल्या माहिन इद्रिस मुलतानी,युवा नेते राहुल लोणीकर, सभापती उत्तम महारू चव्हाण, उपसभापती भगवान आहेर पाटील, युवानेते राहुल राठोड, प्रा. जीवन कोलते पाटील शांताराम खराटे, पंढरी साबळे तसेच आकाश समाधान गायकवाड यांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी नूतन सभापतींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे जिल्हा परिषदेत महायुतीची पकड अधिक मजबूत झाली असून येणाऱ्या काळात विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिला-बालकल्याणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी नव्या नेतृत्वाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.






