छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
श्री क्षेत्र खोपडी (ता. सिन्नर) येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला मोठ्या संख्येने साधू-संत, महंत, भाविक-भक्त, नामधारक, वासनीक तसेच पुजारी बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवाचा मुख्य आकर्षण असलेली भव्य रथयात्रा गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता श्री क्षेत्र खोपडी गावातून मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघणार असून ढोल-ताशा, भजन-कीर्तन आणि जयघोषांनी परिसर दुमदुमून जाणार आहे.
तसेच शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता मुख्यस्थान, आडकित्ता स्थान व विश्रांती स्थान या तीन प्रमुख ठिकाणांहून विशेष मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत धार्मिक विधी, पारंपरिक साज आणि भक्तीभावाचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा, भजन-कीर्तन तसेच पुजारी व गावकरी मंडळी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय रामचंद्र गोसावी बारा गाव पिंपरी यांनी केले आहे.
या कार्यक्रमाची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय रामचंद्र गोसावी यांनी दिली असून, श्री दत्त मंदिर खोपडीचे पुजारी, स्वागतोत्सुक मंडळी व ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व भाविकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येणार आहे.
— भक्ती, परंपरा आणि उत्साह यांचा संगम असलेला हा यात्रा महोत्सव सिन्नर तालुक्यातील धार्मिक आकर्षण ठरणार आहे.






