छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
३१ वर्षांची अखंड ज्ञानसेवा पूर्ण; शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा सन्मान..
जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी व सावळदबारा येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. विनोद काशिनाथ जाधव हे तब्बल ३१ वर्षांची प्रदीर्घ ज्ञानसेवा पूर्ण करून दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सन १९९५ पासून सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जाधव सरांनी “विद्यार्थी हेच दैवत” या भावनेतून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. विषयातील प्रभुत्व, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
उच्चशिक्षित असलेल्या जाधव सरांनी मराठी विषयात SET व PET परीक्षा उत्तीर्ण करून एम.एड. पदवी प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या प्रेरणेने अनेक विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली आहे.
शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी साहित्य, पत्रकारिता व समाजकार्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. ते कवी व साहित्यिक म्हणूनही परिचित असून त्यांचा “फोकी” हा काव्यसंग्रह, “महर्षी वाल्मिकी” हे खंडकाव्य तसेच “शून्यातून संघर्षाची कहाणी” हे आत्मकथन लवकरच प्रकाशित होत आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
जाधव सर हे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष असून आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा व निर्भीड भूमिकेमुळे समाजात, पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये त्यांना विशेष आदर प्राप्त झाला आहे.
या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन शिक्षक भारती परिवार, आदिवासी कोळी महासंघ व स्नेही मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रम आदिवासी कोळी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड, जामनेर येथे सकाळी १० वाजता होणार असून सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंजि. तिर्थेश जाधव, डॉ. मिनल जाधव, कु. तिक्षा जाधव व समस्त जाधव परिवार यांनी या कार्यक्रमासाठी विनम्र निमंत्रण दिले असून शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






