सोयगाव प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
घरासमोर एकटी बसलेल्या मुलीचे अपहरण करून नदीकाठी नेऊन कृत्य; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू…
सोयगाव : तालुक्यातील एका गावात बुधवारी रात्री घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. घरासमोर एकटी बसलेल्या ११ वर्षीय मुलीला अज्ञात नराधमाने जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ही आपल्या कुटुंबासह शेतशिवारात राहत होती. घटनेच्या वेळी ती घरासमोर एकटी बसलेली असताना आरोपीने संधी साधून तिला जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर शिवारातील नदीच्या कडेला नेऊन तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सोयगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली तसेच ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित कुटुंब हे परराज्यातून मजुरीसाठी येथे आलेले असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पिंक पथकाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाची दिशा निश्चित केली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, संदीप सुसर, अजय कोळी, गजानन दांडगे, सादिक तडवी यांची टीम आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करून तपास करत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिस प्रशासनाने आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.






