छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
गारपीट व वादळी वाऱ्याचा दुहेरी फटका; कृषी व महसूल विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांत संताप
सोयगाव : तालुक्यातील सोयगाव, जरंडी व सावळदबारा परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा, लिंबू, केळी, पपई तसेच रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, बाजरी व मका पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र या गंभीर नुकसानीनंतरही सोयगाव महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून ठप्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सोयगाव आणि जरंडी या दोन मंडळांतील तब्बल ३३ गावांना अवकाळीचा फटका बसला आहे. यामध्ये जरंडी, निंबायती व धिंगापूर ही गावे गारपीटग्रस्त ठरली आहेत. १८ मार्चच्या रात्री अचानक आलेल्या वादळामुळे फळबागांमधील आंबा व लिंबूची लहान फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली, तर केळी व पपईची झाडे उन्मळून पडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी केळीबागा पूर्णतः करपल्यासारख्या झाल्या आहेत.
नुकसान झाल्यानंतर सुरुवातीचे दोन दिवस महसूल व कृषी विभागाने केवळ थातूरमातूर पंचनामे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यानंतर संबंधित पथके चार दिवसांपासून गावात न फिरकल्याने पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून नवीन पथके नियुक्त करावीत, तसेच तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीसाठी घेतलेली कर्जे व हातउसणवारी कशी फेडायची, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
“””तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी सांगितले की, “सोयगाव व जरंडी मंडळात नुकसानीची पाहणी पूर्ण झाली असून, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तातडीने सोयगाव कृषी विभागाशी संपर्क साधून पंचनामा करून घ्यावा.”
तालुका कृषी अधिकारी भारत कासार सोयगाव






