छ. संभाजी नगर: गोकुळसिंग राजपूत
जि.प. सर्कल व पंचायत समिती गण निवडणुकीच्या रणधुमाळीत
सिल्लोड तालुक्यात महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी प्रचाराचा झंझावात उडवत राजकीय ताकद दाखवून दिली आहे. उपजिल्हा प्रमुख छत्रपती संभाजीनगर विठ्ठल बदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य प्रचार दौऱ्यामुळे संपूर्ण सिल्लोड परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सिल्लोड तालुक्यातील उंबणगाव जिल्हा परिषद सर्कल व हट्टी पंचायत समिती गण येथे महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अधिकृत उमेदवार, जिल्हा परिषदेसाठी मशाल चिन्हाचे उमेदवार प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दांडगे तसेच पंचायत समितीसाठी समाधान भेटकर यांच्या प्रचारार्थ हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
या प्रचार दौऱ्यात विठ्ठल बदर पाटील यांनी थेट शब्दांत सत्ताधाऱ्यांच्या अपयशी धोरणांवर टीका करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रवृत्तीचा समाचार घेतला. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतकरी व युवकांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी फक्त आश्वासनांची खैरात वाटली असून प्रत्यक्षात विकास शून्य असल्याचा आरोप त्यांनी केला.
“खरी शिवसेना, लोकांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे. मशाल चिन्ह म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटलेली ज्योत असून ही ज्योत ग्रामपातळीवरून जिल्हा परिषदपर्यंत पोहोचवायची आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या दौऱ्यादरम्यान गावोगावी पदयात्रा, बैठका व थेट मतदार संवाद साधण्यात आला. ठिकठिकाणी ग्रामस्थ, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. विशेषतः युवकांमध्ये महाविकास आघाडीबाबत सकारात्मक वातावरण दिसून आले, यामुळे विरोधी गोटात चिंता वाढल्याचे चित्र आहे.
या प्रचार दौऱ्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून बूथनिहाय नियोजन अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे. सिल्लोड तालुक्यात मशाल चिन्हाचा प्रभाव वाढताना दिसत असून निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जोरदार टक्कर मिळणार असल्याचे संकेत या दौऱ्यातून स्पष्ट झाले आहेत.
याबाबत माहिती देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे संपादक दशरथ सुरडकर यांनी सांगितले की, “उपजिल्हा प्रमुख विठ्ठल बदर पाटील यांच्या दौऱ्यामुळे जनतेचा कौल स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकत असून येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन निश्चित आहे.”






