छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; १०.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
टोयोटा रुमिओनमधून बनावट रॉयल स्टॅगच्या ५२८ बाटल्या जप्त
हर्सुल–पिसादेवी रोडवर सापळा; बनावट दारू पुरवठा करणारे रॅकेट जेरबंद
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हर्सुल परिसरात धडक कारवाई करत बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हर्सुल ते पिसादेवी रोड परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित टोयोटा रुमिओन (क्र. MH-20-GV-7759) या वाहनाचा पाठलाग करून तपासणी केली असता वाहनामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ५२८ बाटल्या आढळून आल्या. प्राथमिक तपासात या बाटल्या बनावट असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी विक्रम उत्तम वाघ (वय ३०), अनिकेत साईनाथ करारे (वय २७), कपिल कचरू क्षीरसागर (वय ३२), मिलिंद मल्हारी अहिरे (वय २९) आणि ओम हिरस्वामी गुंडलेकर (वय २०) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे मद्य बाळगण्याचा परवाना नसल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ), (ई), ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ५२८ बाटल्या आणि पांढऱ्या रंगाची टोयोटा रुमिओन कार असा एकूण १०,४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर, अधीक्षक अभिनव बालुरे आणि उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईदरम्यान निरीक्षक आनंद चौधरी, दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड, तसेच पथकातील अधिकारी व जवानांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड करीत आहेत.






