८० वर्षीय वृद्धेवरील अत्याचार प्रकरण पेटले; बंजारा समाजाचा सोयगाव तहसीलवर मोर्चा
जरंडी तांडा प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी;
सोयगाव : प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी तांडा येथे ८० वर्षीय वृद्ध महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंजारा समाजाच्या वतीने गुरुवारी सोयगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे आरोपी रमजान शेख व त्याच्या सहकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची रविकांत राठोड राष्ट्रीय अध्यक्ष, युवानेते राहुल राठोड, सभापती उत्तम महारु चव्हाण व सकल बंजारा समाज व हिंदू समाज बांधव सोयगाव व सावळदबारा यांच्या कडून मागणी करण्यात आली.
सोयगाव मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री Devendra Fadnavis यांना उद्देशून निवेदन सादर केले. हे निवेदन तहसीलदार मनीषा मेने यांच्याकडे देण्यात आले. एका असहाय ८० वर्षीय वृद्ध महिलेवर झालेला अत्याचार हा समाजाच्या सुरक्षेला मोठे आव्हान निर्माण करणारा असून अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
निवेदनात सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला मदत करणाऱ्या व्यक्तींनाही सहआरोपी करण्यात यावे, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून Ujjwal Nikam यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी सभापती उत्तम महारु चव्हाण यांच्या कडून करण्यात आली आहे.
याशिवाय पीडित महिलेला शासनाकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी व तिच्या सुरक्षेसाठी पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तांड्यांमधील बंजारा भटक्या-विमुक्त समाजातील महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली.
तसेच २०१७ मध्ये सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा तांडा येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाचीही पुनर्चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष Ravikant Rathod यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती उत्तम महारू चव्हाण, राहुल राठोड व सकल बंजारा समाजाच्या वतीने तहसीलदारांकडे देण्यात आले.
आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.






