विशेष प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर
बीड;राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान टप्पा – १ अंतर्गत लिंबागणेश येथे 1 मार्च बुधवारी आयोजित करण्यात आलेले महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले . लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती देवस्थान सभामंडपात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये शेतकरी , ग्रामस्थ , महिला बचत गट , विद्यार्थी तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेतला .
राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख , पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे महाराजस्व अभियान सुरू केले आहे . नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे , प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे . लिंबागणेश येथे आयोजित शिबिराने या उद्दिष्टांना प्रत्यक्ष स्वरूप दिले असल्याचे चित्र पाहायला मिळाले .
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते . कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , उपजिल्हाधिकारी ( सामान्य प्रशासन ) शैलेश सूर्यवंशी , उपविभागीय अधिकारी कविता जाधव , तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली . प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले .
कार्यक्रमास राजेंद्र मस्के , बळीराम गवते , डॉ . गणेश ढवळे , गोरखनाथ सिंगर तसेच महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यामध्ये निवासी नायब तहसीलदार सुहास हजारे , नायब तहसीलदार प्रशांत जाधवर , निवडणूक नायब तहसीलदार सुरेंद्र डोके , नायब तहसीलदार अण्णासाहेब वंजारे , पुरवठा निरीक्षक प्रशांत सुपेकर , उपाधीक्षक भूमि अभिलेख अनिल शिवणकर , आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक अशोक लोखंडे , राज्य परिवहन महामंडळाचे पंकज गोरे , पुरुषोत्तम आंधळे , महादेव चौरे , दादासाहेब शेळके तसेच बीड तालुक्यातील सर्व महसूल मंडळ अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी , महसूल सेवक आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते .
लिंबागणेश महसूल मंडळातील २२ गावचे सरपंच , उपसरपंच , पोलीस पाटील , ग्रामपंचायत सदस्य , माजी जिल्हा परिषद सदस्य , माजी पंचायत समिती सदस्य तसेच महिला बचत गट , शेतकरी गट , विद्यार्थी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले . नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला लोकाभिमुख स्वरूप प्राप्त झाले .
या शिबिराच्या माध्यमातून विविध विभागांचे माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते . महसूल विभागाशी संबंधित जमीन नोंदणी , खातेफोड , वारस नोंद , सातबारा उतारे , विविध दाखले व प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली . नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले .
शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना देण्यात आला . यामध्ये जिवंत सातबारा ( मयत खातेदार कमी करणे ) , डिजिटल सातबारा वाटप , वारस फेरफार , वर्ग – १ ते वर्ग – २ रूपांतर , ई – पिक पाहणी , ॲग्रीस्टॅक नोंदणी , ई – वसुली पावती , सेवामित्र प्रमाणपत्र , प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र , पानंद रस्ते योजना , रस्त्यांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर घेणे , ई – केवायसी प्रक्रिया , आधार कॅम्प , ई – शिधापत्रिका वाटप , लक्ष्मी मुक्ती योजना लाभ , रक्तदान शिबिर , अभिलेख दुरुस्ती , मोफत आरोग्य तपासणी , घरकुल मंजुरी आदेश , गायरान मंजुरी आदेश तसेच मागेल त्याला शेततळे योजना याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली .
या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध सेवा नागरिकांना देण्यात आल्या . त्यामध्ये २७६० डिजिटल सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले . तसेच २१० डिजिटल शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले . महसूल विभागाशी संबंधित ६० फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला . विविध योजनांअंतर्गत २७२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले . याशिवाय १३४ मोफत बस पासचे वितरण करण्यात आले . १८१ आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले . तसेच २२२ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांसाठी या शिबिरात विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती . लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे अनेक वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळाला .
या शिबिरामुळे महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले . अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाशी थेट संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या . अधिकाऱ्यांनी त्या समस्यांवर मार्गदर्शन करून काही प्रकरणे जागेवरच निकाली काढली . त्यामुळे नागरिकांना तालुका कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही .
यावेळी बोलताना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नमूद केले की महाराष्ट्र शासनामार्फत ही अत्यंत महत्त्वाची योजना नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे . प्रशासनाकडून नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल . कोणीही सर्वसामान्य नागरिक मला कधीही फोनवर बोलू शकता आणि समस्येचे निराकरण करू शकता .
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले . प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होण्यासाठी अशा शिबिरांचे मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या विचारांप्रमाणे शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले .
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी पंडित नायकवाडे तसेच ग्राम महसूल अधिकारी गणपत पोतदार , शिवराम येवले , शेख गफूर , नारायण दराडे , प्रमोद कोळपकर , अश्विनी डोळस तसेच महसूल सेवक बाबासाहेब बिरलिंगे आणि ललित काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले .
एकूणच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे प्रभावी उदाहरण ठरले . नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद , विविध विभागांचा समन्वय आणि प्रशासनाची तत्परता यामुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले . शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची शिबिरे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली .






