छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी येथे मंगळवारी (दि.१० मार्च) पर्यटकांवर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सुमारे ३० ते ३५ पर्यटक जखमी झाले असून त्यामध्ये चार ते पाच लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील जबलपूर येथून आलेल्या एका कुटुंबावर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात एका चिमुकलीच्या घोट्याला मधमाशांनी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. उपस्थित पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
अजिंठा लेणी परिसरात मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. तरीही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. जगभरातून हजारो पर्यटक दररोज अजिंठा लेणी पाहण्यासाठी येत असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक व पर्यटकांनी लेणी परिसरातील मधमाशांचे पोळे सुरक्षितरीत्या हटविणे, पर्यटकांसाठी संरक्षणात्मक उपाययोजना करणे आणि तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे अशी मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






