सोयगाव : प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगावात भाजपचे वर्चस्व; सभापती उत्तम चव्हाण व उपसभापती गायबाई घोडे यांचा भव्य सत्कार
सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी कन्नड मतदारसंघातील आमदार संजनाताई यांच्या गोंदेगाव गणातील गायबाई गोविंद घोडे यांची निवड झाल्याने तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून दोन्ही पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा व फर्दापूर गणातून विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य माहिन इद्रिस मुलतानी, उत्तम महारू चव्हाण आणि राहुल राठोड यांच्या विजयामुळे तालुक्यात भाजपचे बळ अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोयगाव पंचायत समिती येथे सभापती व उपसभापती पदाच्या निवडीनंतर पदग्रहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसजी मुलतानी, प्राचार्य एन आर कोलते पाटील,महेशशिंह (सोनू) ठाकूर देव्हारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सभापती उत्तम महारू चव्हाण यांचा प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, राहुल राठोड, अंकुश कोलते,महेशसिंह ठाकूर,प्रा जीवन कोलते पाटील, संजय राजपूत, शांताराम खराटे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. तदनंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, शेती, शिक्षण आणि इतर विकासकामांना गती देण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जातील. नव्याने निवड झालेले सभापती उत्तम चव्हाण आणि उपसभापती गायबाई घोडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वासही प्रा जीवन कोलते पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्याने निवड झालेल्या उत्तम चव्हाण सभापती व उपसभापतींचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे सोयगाव तालुक्यातील व सावळदबारा परिसरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात तालुक्याच्या विकासाला नवे दिशा मिळतील, अशी अपेक्षा महेशसिंह ठाकूर (सोनू) यांच्या कडून व्यक्त करण्यात आल्या आहे.






