Home / Uncategorized / खाकीचा संतापजनक अवतार : बिलाच्या वादातून पोलिसाकडून हॉटेलमध्ये चाकूहल्ला; चौघांवर गुन्हा दाखल…

खाकीचा संतापजनक अवतार : बिलाच्या वादातून पोलिसाकडून हॉटेलमध्ये चाकूहल्ला; चौघांवर गुन्हा दाखल…

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुलिवंदनाच्या दिवशी कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याकडूनच गंभीर गुन्हा घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे–सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव (पांढरी) शिवारातील ‘हॉटेल कार्तिक’ येथे बिलाच्या वादातून झालेल्या हाणामारीत पोलीस कर्मचारी नितेश जाधव याने आपल्या तीन साथीदारांसह हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत चौघेजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास संबंधित पोलीस कर्मचारी आपल्या तीन मित्रांसह हॉटेलमध्ये जेवण व मद्यपानासाठी गेला होता. जेवणानंतर बिल दिल्यानंतर रकमेवरून वाद निर्माण झाला. ‘बिल जास्त आहे’ असा आक्षेप घेत संबंधिताने हॉटेल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. उपस्थितांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता वाद अधिक चिघळला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात आरोपीने जवळील चाकू काढून हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांवर सपासप वार केल्याचे सांगितले जाते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित कर्मचाऱ्यावर विभागीय कारवाई व निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते.

धुलिवंदनाचा सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असताना, त्याच दिवशी अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच कायदा हातात घेतल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार