छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
हळदीच्या दिवशीही वर्तमानपत्रांचे नियमित वितरण; बारागाव पिंपरी परिसरात कौतुकाची थाप
सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील स्वतःच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणीही कर्तव्याला प्राधान्य देणारे तरुण क्वचितच पाहायला मिळतात. चि. सार्थक दत्तात्रय गोसावी यांनी आपल्या लग्नाच्या आनंदसोहळ्यातही सेवाभाव जपत एक आदर्श घालून दिला आहे.
चि. सार्थक दत्तात्रय गोसावी व चि. सौ. कां. पूजा युवराज गोसावी यांचा शुभविवाह सोहळा गुरुवार दिनांक ५ मार्च २०२६ रोजी संपन्न होत आहे, तर बुधवार दिनांक ४ मार्च २०२६ रोजी हळद समारंभ पार पडला. लग्नाची लगबग, पाहुण्यांची वर्दळ आणि घरातील उत्साहाचे वातावरण असतानाही सार्थक यांनी आपले दैनंदिन कर्तव्य विसरले नाही.
गेली अनेक वर्षे ते बारागाव पिंपरी व परिसरातील गावांमध्ये दररोज पहाटे उठून वर्तमानपत्र वितरणाचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. वाचकांपर्यंत बातम्यांचा ताजा अंक वेळेवर पोहोचावा यासाठी ते सातत्याने झटत आले आहेत. विशेष म्हणजे, हळदीच्या दिवशी सकाळी स्वतःच्या कार्यक्रमापूर्वी त्यांनी सर्व दैनिक वर्तमानपत्रांचे वितरण करून आपली सेवा कायम ठेवली.चि. सार्थकचे वडील पण दत्तात्रेय रामचंद्र गोसावी हे नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो नेहमी धावपळीचे जीवन जगत असतात त्यांच्या घरी
“लग्न असले तरी वाचकांची सेवा थांबता कामा नये,” अशी भावना मनात ठेवून सार्थक यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या कर्तव्यदक्ष वृत्तीचे गावकऱ्यांनी आणि वाचकांनी मनापासून कौतुक केले आहे.
आजच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या आनंदापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देणारा हा आदर्श तरुण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशीही सेवेत खंड पडू न देणाऱ्या सार्थक गोसावी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सार्थक यांच्या या कृतीतून “कर्तव्य हाच खरा धर्म” हा संदेश अधोरेखित झाला असून, समाजात सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.





