छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड येथे निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन; दादाराव अपार व रोशन शहा उपस्थित
सिल्लोड : राज्याचे माजी मंत्री तथा सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लाडके आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या पत्नी दिवंगत नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांच्या नुकत्याच झालेल्या दुःखद निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘दैनिक माझा मराठवाडा’चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी सिल्लोड येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार अब्दुल सत्तार साहेब व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व दुःख व्यक्त करत सांत्वन केले. या प्रसंगी त्यांनी दिवंगत नफीसा बेगम यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्यांच्या कार्याला मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांनी आदरांजली वाहिली.
नफीसा बेगम या सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील विकासकामांना गती दिली होती. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी कायम ठेवले होते. त्यांच्या साध्या, मनमिळावू स्वभावामुळे त्या सर्व स्तरांत लोकप्रिय होत्या. या सांत्वन भेटीदरम्यान मादणी ग्रामपंचायतीचे सदस्य तथा ‘दैनिक माझा मराठवाडा’चे शिवना–मादणी प्रतिनिधी दादाराव अपार व माजी उपसरपंच रोशन शहा हेही उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
दिवंगत नफीसा बेगम यांच्या निधनामुळे सिल्लोड–सोयगाव मतदारसंघात शोककळा पसरली असून विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.






