- सिंदखेडराजा: मुन्ना ठाकूर
चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण

नजीकच्या चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणी माजी आमदार यांच्या भूमिकेला लक्ष करीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख असलेल्या सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरळसरळ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात चिखला काकड, ता. लोणार येथील प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या जातीयवादी विखारी भूमिकेमुळे अस्वस्थ झाल्याचे राजीनामा पत्रात विदित करीत सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी राजीनामा मंजूर करुन आपला श्वास मोकळा करण्याचे राजीनामा पत्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविले आहे.
ह्या राजीनामा पत्रात पुढे म्हटले आहे की, शिवसेनेचे संस्थापक माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रवाहित करण्याचे काम शिवसेनेतील नेते, पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मिळून केले पाहिजे.
परंतु शिवसेनेचे नेते व सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी वंजारी समाजाला लक्ष्य (टारगेट) केले आहे. त्यामागे चिखला काकड येथील घटनेची कुठलीही शहानिशा केली नाही. कोणत्याही प्रकारची न्याय भूमिका ठेवली नाही, तर मनात आकसभाव सरळसरळ एक बाजू लावून धरली आहे.
सौ. जयश्री दीपक कायंदे ह्या ज्या समाजातून येतात त्याबद्दल तिरस्काराची भूमिका ठेवली आहे, असा आरोप पत्रात आहे.
अशा व्यक्तींच्या नेतृत्वाखाली काम करणे नक्कीच चुकीचे आहे.
ह्या सगळ्या प्रकरणामुळे व सामाजिक भावनेचा आदर करीत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात शेवटी नमूद केले आहे. तर माझा राजीनामा मंजूर करुन आपल्याला श्वास मोकळा करुन देण्यात यावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
मागील काळात अनेक प्रलोभने धुडकावून लावत, शिवसेना व नेते तथा माजी आमदार डॉ. यांच्याशी कायमस्वरुपी एकनिष्ठ राहिलेल्या सौ. जयश्री दीपक कायंदे ह्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय, सामाजिक आदि क्षेत्रात खळबळ उडाली आहे, एवढे मात्र निश्चित ..!






