सोयगाव प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सावळदबारात शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची महत्त्वपूर्ण बैठक समाधान गायकवाड यांच्या कार्यालयात पार पडली. येत्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होणाऱ्या Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी अंकुश प्रभू कोते, उपाध्यक्षपदी भावेश टिकारे, सचिवपदी आकाश गायकवाड तर सल्लागारपदी संदीप कोलते पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी प्रा. जीवन कोलते पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करत शिवजयंती उत्सव सामाजिक सलोख्यात, शांततेत व प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. शिवरायांचे विचार, त्यांचे आदर्श आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यंदा शिवजयंती उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी मिरवणूक, पुष्पहार अर्पण, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यावर बैठकीत चर्चा झाली. गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी केले.
या बैठकीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा परिसरात शिवजयंती उत्सवाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तयारीला वेग आला आहे.






