पैठण छ. संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधि : श्रीपत पवार
पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील प्रलंबित उपकामांना अखेर गती मिळाली असून आमदार विलास भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेली कामे सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. या कामांमुळे पंचायत समिती परिसराचे रूपडे बदलत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंचायत समिती कार्यालयात दररोज तालुक्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने विविध कामांसाठी येत असतात. यापूर्वी वाहनतळाची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांची शिस्तबद्ध उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून ८० एमएम जाडीचे दर्जेदार पेवर ब्लॉक बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. पावसाळ्यात परिसरात पाणी साचून चिखल होत असल्याने कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन परिसराचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले असून इमारतीच्या चोहोबाजूंनी मजबूत बांधकाम करण्यात आले आहे.
याशिवाय संरक्षण भिंत उभारण्यात आल्याने परिसर अधिक सुरक्षित झाला आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर पंचायत समिती कार्यालयाचा परिसर स्वच्छ, सुबक व सुरक्षित होणार असून खेडोपाड्यातून येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्थानिक नागरिकांकडून या कामांचे स्वागत करण्यात येत असून, लवकरच सर्व कामे पूर्णत्वास जावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






